...त्या सहा खुनांचे गूढ आजही कायम 

चाकण: (अविनाश दुधवडे) 
  खराबवाडीतील अनोळखी युवतीचा निर्घुण खून ... पाळू येथील जेष्ठ महिला... महाळुंगेतील शेतकरी.... कोरेगाव खुर्द येथील अल्पवयीन मुलगा... चिंचोशी येथील अल्पवयीन मुलगी .....आणि धामनेतील युवतीचा नियोजनबद्ध खून .... अशा सहा खुनांचा तपास पोलिस दफ्तरी प्रलंबित आहे. नुकताच झालेला धामणे खून वगळता इतर खुनांची तपास फाईल जवळपास बंद झाली आहे. स्थानिक पोलिसांसह एलसीबीच्या चाणाक्ष पथकांनासुद्धा या खुनांचा छडा लावता आला नाही. त्यामुळे या सहा खुनाबाबतचे गूढ अद्यापही कायम आहे.  
  यातील सर्व खुनांचे गुन्हे त्या-त्या वेळी दाखल होऊन तपास सुरू झाले खुनानंतर एलसीबी कडूनही त्याची माहिती घेण्यात आली,  मात्र चक्रावून टाकणाऱ्या या खुनाच्या घटनांनी पोलिसांना आजही भंडावून सोडलेले आहे. एलसीबी कडील तंत्रज्ञान आणि खबऱ्यांचा वापर करून आरोपींना पकडले जाते. तसेच बऱ्याचदा खुनाचा छडा लावला जातो. प्रलंबित गुन्ह्याचा तपास, फरारी आरोपींना पकडण्याची जबाबदारी एलसीबी कडे असते. परंतु चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सहापैकी पाच ‘फाईल बंद’ खुनाचा तपास आणि नुकताच धामणे येथील युवतीच्या खुनाचा छडा लावण्याचे आव्हान स्थानिक पोलिसांसह एलसीबीच्या समोर आहे.  
     खराबवाडी (ता. खेड ) येथे अंदाजे २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेची धारदार शस्त्राने अनेक वार निर्घृण हत्या करून छिन्नविच्छिन्न मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना ७ जुलै २०१७ रोजी उघडकीस आली होती. परंतू त्या महिलेची ओळख पटविण्यात अद्याप पर्यंत पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणांचा तपास थांबला आहे. संबंधित युवतीच्या फोटो चौकांमध्ये लावण्यात आले, १५ हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले मात्र त्या महिलेची ओळख पटली नाही व आरोपीही मोकाट आहेत.
     दोन महिन्यापूर्वी (ऑक्टोबर २०१७) सीताबाई तुकाराम गावडे ( वय ५२, रा. पाळू, पो. पाईट, ता.खेड) यांचा पाळू ( ता. खेड) येथे दोन अज्ञात इसमांकडून अत्यंत निर्घृण खून करण्यात आला होता. तीक्ष्ण हत्यारांनी केलेल्या या हल्ल्यात डोक्याच्या कवटीचा वरील भाग कापून धडा वेगळा करण्यात आला होता, तर अन्य एकास गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्राणघातक हल्ल्याच्या थरारक घटनेचे गूढ उकलणे पोलिसांपुढे अद्यापही आव्हान ठरले आहे.
   चाकण जवळील महाळुंगे इंगळे ( ता. खेड)  येथील टेकड वस्तीवर शनिवार दि. ९ डिसेंबर २०१७ रोजी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालण्यात आला. ऐवज लुटण्यात आलाच मात्र दरोडेखोरांनी केलेल्या जबर मारहाणीत शेतकरी शिवाजी गुलाबराव शिवळे ( वय ५०, रा. महाळुंगे, टेकडवस्ती, ता. खेड) यांचा मृत्यू झाला. यातील दरोडेखोरांच्या टोळीचा शोध घेण्याचे दिव्य पोलिसांच्या समोर उभे ठाकले आहे.
     जानेवारी २०१५ मध्ये पहाटे दोन वाजनेचे सुमारास कोरेगाव खुर्द येथे आपल्या राहत्या घराच्या बाजूलाच प्रातविधीसाठी गेलेल्या आकाश संदीप महाळुंगकर (वय १३,रा. कोरेगाव खुर्द ,ता.खेड,जि.पुणे) याला अज्ञातांनी पेटवून दिले होते. तेरा वर्षांच्या चिमुरड्या आकाशच्या खुनाचे गूढ उकलण्याचे आव्हान घटनेच्या तीन वर्षांनंतरही पोलिसांसमोर कठीण झालेले आहे. या खुनाच्या तपासात अनेकांची नार्को चाचणी झाली, कित्येकांची चौकशी झाली तरीही आरोपी न मिळाल्याने पोलिसांनाही या घटनेने आजही चक्रावून टाकलेले आहे. 
    ४ डिसेंबर २०१७ रोजी कोमल कांताराम कोळेकर (वय १७ वर्षे ६ महिने, रा.धामणे, ता.खेड जि.पुणे)  या चार दिवस बेपत्ता असलेल्या युवतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. तिचा विवस्त्र मृतदेह धामणे (ता. खेड) येथे त्यांच्याच शेतात मिळाला.  अनेकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले, घरातील जवळच्या नातेवाईकांकडेही कसून चौकशी करण्यात आली. आरोपी टप्प्यात असल्याचे पोलीस खाजगीत सांगत असले तरीही ठोस पुरावा अद्याप पोलिसांच्या हातात नसल्याने पोलिसांना या बाबतचे काही वैद्यकीय अहवाल मिळेपर्यंत  हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. 


सीआयडी सुद्धा हतबल ?  :
  चिंचोशी (ता.खेड) येथे सुमारे सात वर्षापूर्वी (२०१०) आठ वर्षीय चिमुरडीचा मान कापून झालेल्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्याचा तपास नातेवाईकांच्या मागणीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने सीआयडीमार्फत करण्याचे आदेश दिले नऊ महिन्यांपूवी ( मार्च २०१७) दिले होते . मागील सात वर्षांत सुमारे आठ तापसी अधिकाऱ्यांनी व नंतर सीआयडीने या गुन्ह्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अद्याप पर्यंत सिमरन विल्सन रायप्पा ( वय ८ वर्षेरा. चिंचोशी ता.खेड) या चिमुरडीच्या खुनाचा ठोस तपास लागलेला नाही. 
अविनाश दुधवडे (पत्रकार)
मो.९९२२४५७४७५  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)