रात्रीचा 'मौल्यवान' प्रचार आतापासूनच सुरु
रात्रीचा 'मौल्यवान' प्रचार आतापासूनच सुरु
वैऱ्याची रात्र तव्हा नाय , आताच हाय....
चाकण:
उन्हाची काहिली वाढली असली तर दिवसा भर उन्हात प्रचाराचा धुरळा उडत दिवसाचा प्रचार थंडावला कि रात्री दहा नंतरही छुपा ' मौल्यवान ' प्रचार चाकण भागात सुरु झाला आहे. ताई, माई, आक्कांसह दादा भाऊंनाही साद घालत उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन रात्री दहा नंतर रात्री उशिरा पर्यंत करण्यात येत आहे . साधारणपणे मतदानाच्या आदल्या दिवशीची ती रात्र सर्वार्थाने वैऱ्याची रात्र मानली जाते. त्या रात्रीत मोठ्या उलाढाली होतात. मात्र त्या रात्रीत काहीही करणे शक्य झाले नाही आणि ती रात्र आपल्यासाठीच वैऱ्याची झाली तर ..? या विचाराने अनेक दिग्गज उमेदवारांना भंडावून सोडले असून काही चाणाक्ष उमेदवारांनी आता'कशाला उद्याची बात ' म्हणत मतदानाच्या चक्क चार-सहा दिवस आधीच त्या वैऱ्याच्या रात्रीची वाट न पाहता "आतून फिल्डिंग' लावली आहे. एक गठ्ठा मतदानाच्या अपेक्षेने चाकण मधील एका मोठ्या वस्तीत सोमवारी (दि.७) रात्री दहा नंतर रात्री उशिरा पर्यंत असा 'मौल्यवान ' प्रचार झाल्याची चर्चा आहे.
मतदाना पूर्वीची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते . त्या आदल्या रात्रीत अनेक चित्रं बदललेली अनेकांनी पहिली आहेत . विजयी होणारा उमेदवार आडवा झाल्याची उदाहरण आहेत. त्यामुळे आता सारेच सावध आहेत. तटस्थ राहणारे, ऐनवेळेला निर्णय घेणारे मतांचे गठ्ठे आपल्या पदरात पाडण्यासाठी विशेष प्रयत्न आतापासूनच सुरु झाले आहेत . ही मते कशी मिळवायची असतात, याची मेख उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलीच माहिती आहे. त्यातील तज्ज्ञ मंडळी साऱ्याच पक्षांकडे आहेत.
"नोटा इस्कटा अन् मत गोळा करा' ही अलीकडची पॉलिसी बनल्यानं मतदानाची आदली रात्र धोक्याची म्हणूनच वैऱ्याची असं म्हटलं जातं. यंदा निवडणूक आयोगाने काटेकोर नियम लावल्याने आणि रस्तो-रस्ती मोठा बंदोबस्त आणि चेकपोस्ट लावलेले असल्याने व वाहनांची कसून तपासणी होत असल्याने त्या वैऱ्याच्या रात्रीत काहीच करणे शक्य होणार नसल्याची अनेकांना खात्री पटली आहे. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी , उमेदवारांनी कार्यकर्त्यांना आताच सावध राहण्याची आणि आपला खेळ ताकदीने करण्याच्या सूचना देऊन ठेवल्या आहेत .
प्रत्येक निवडणुकीत काही ना काही नवा ट्रेंड समोर येत असतो. या निवडणुकीत जाहीर सभा, पदयात्रा, कोपरा सभांप्रमाणेच 'आतून फिल्डिंग' लावण्यावर उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात जोर दिल्याचे दिसत आहे . गावा-गावांतील छोटे-छोटे गट बांधून घेण्यासाठी त्यांना 'शब्द' आणि'शिदा' दोन्ही देऊ केले. कुणी उलटा प्रचार करीत असेल तर त्याला गप्प राहण्याची किंमत पोचती होत आहे . या भागात प्रथमच शिवसेना, कॉंग्रेस , राष्ट्रवादी, अशा सगळ्याच पक्षाच्या अनेक जणांनी नाराज होऊन किंवा विधानसभेची आस लागल्याने मूळ गटाला सोडचिठ्ठी दिली आणि नव्या गटाचा पट्टा गळ्यात घातला. डोक्यावर टोपी राहिली, त्यावरचं चिन्ह मात्र बदलल्याचे या भागातील मतदारांनी पहिले आहे . ऐनवेळेला फोडाफोडी करण्याची आणि मत वळविण्याची जबाबदारी असणाऱ्यांनी त्या वैऱ्याच्या रात्रीची तयारीला आताच केली असून चक्क उमेदवारांचे जवळचे नातेवाईक घेवूनच कायर्कर्ते ' मौल्यवान फिल्डिंग ' लावीत आहेत. दरम्यान असे असले तरी , अनेक मंडळी ‘ देखल्या देवा दंडवत ‘ या म्हणी प्रमाणे कुणालाही नाराज न करता सर्वांचे थोडे-थोडे घेण्याची सोयीची भूमिका ठेवणारे असल्याने प्रत्यक्षात मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार हा प्रश्न उमेदवारांसह सर्वांनाच भंडावून सोडणारा आहे.
-----------------------
-----------------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा