...तर सगळ्यांना वठणीवरच आणतो
स्थानिकांना रोजगार देण्याची राज्यकर्त्यांचीच इच्छा नाही
चाकण मधील सभेला संबोधित करताना राज ठाकरे ( छायाचित्र : सम्राट कम्युनिकेशन ,चाकण) |
चाकण मधील सभेत राज ठाकरे यांचे प्रतिपादन
चाकण:
चाकण प्रमाणेच महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात गेलं तर एकच ऐकायला मिळतं, कारखाने आले. मात्र त्यात परप्रांतिय घुसलेत. स्थानिक भुमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळत नाही , राज्यकर्त्यांची तशी इच्छा नाही ,राज्यकर्त्यांचाच कुणावरही वचक राहिलेला नाही . त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तुम्ही साथ द्यालच पण त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येही साथ द्या ,राज्याची संपूर्ण ताकद एकदा देऊन बघा, राज्य माझ्या हातात दिले तर सगळ्यांना वठणीवरच आणतो असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
चाकण (ता.खेड,जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात आज (दि.१३) मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात ठाकरे बोलत होते. मनसेचे अनिल शिदोरे,खा.गजानन बाबर, शरद सोनवणे ,रामदास धनवटे, अभय वाडेकर ,श्रीकांत जाधव, योगेश आगरकर, रोहिदास घाडगे, समीर थिगळे, नितीन ताठे ,अल्ताफ शेख, यांच्यासह मनसेचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रचंड जनसमुदाय यावेळी उपस्थित होता .
चाकण मधील सभेला जमलेला प्रचंड जनसमुदाय ( छायाचित्र : सम्राट कम्युनिकेशन ,चाकण) |
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले कि, शेतकरी कुटुंबातील अशोक खांडेभराड सामान्यांशी नाळ जोडलेले उमेदवार आहेत. संवेदनशील आहेत, मला लोकसभेत शिरूर मधून सामान्य शेतकरी कुटुंबातील खांडेभराड यांच्यासारखा खासदार पाठवायचा आहे, उद्योगपती पाठवायचा नाही. या भागात विमानतळ आणायचे सांगून विद्यमान सत्ताधाऱ्यांनी येथे शेतकऱ्यांचा जमिनी कमी किमतीने घेतल्या आणि आता त्या उद्योग आणि विमानतळासाठी अधिक किमतींना देण्यात येत आहेत. या निवडणुकीत घड्याळ हातासकट छाटून टाका असे आवाहन करताना शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांनी या भागाच्या विकासासाठी काहीही केले नाही , येथे उद्योग येत असताना त्यांनी स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते पण ते स्वतःच्याच उद्योगात व्यस्त राहिल्याने भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे असा हल्लाही त्यांनी खा.आढळराव यांच्यावर चढविला. यवतमाळच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तेव्हा त्याने मूत्यूपूर्वी लिहून ठेवलेले पत्र आपल्याकडे असल्याचे सांगून त्या शेतकऱ्याने पत्रात म्हटले आहे, की माझ्या आत्महत्येस राष्ट्रवादी व कॉंग्रेसच जबाबदार आहे. त्यांना माफ करू नका, असा दावाही राज ठाकरे यांनी यावेळी केला. आपल्या बारा मिनिटांच्या भाषणात त्यांनी सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सह या भागाचे शिवसेनेचे खासदार यांना लक्ष केले. यावेळी तालुक्यातील बाळासाहेब ताये यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी व सेनेचा समाचार :
मराठीच्या अस्मितेचा मुद्दा, महाराष्ट्रात बदल घडविण्यासाठी राज्याच्या पूर्ण सत्तेचे आवाहन आणि सरतेशेवटी सत्ताधाऱ्यांविषयीच्या नाराजीवर कोरडे ओढीत हमखास टाळ्या मिळविणाऱ्या वाक्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका करताना राज ठाकरे यांनी शिवसेनेला चांगलेच टार्गेट केले. खेड तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ , भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या प्रश्नांना हात घालताना स्थानिकांचे काय हात तुटलेत ? असा मुद्दा उपस्थित करीत स्थानिक मराठीच्या मुद्द्याला स्पर्श करण्याच्या मुद्द्याभोवती राज ठाकरे यांचे भाषण होते.
काय बोलणार घंटा:
या भागाचे खासदार आढळराव यांनी या मतदार संघात म्हणे घंटा गाड्या दिल्या. खासदारांनी विकासाची काय कामे करावीत ते शिकले पाहिजे. आता त्यांनी जर कचरा उचलण्यासाठी घंटा गाड्या दिल्या असतील तर त्या बद्दल काय बोलणार घंटा? असा प्रश्न उपस्थित करीत मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांना प्रचंड मतांनी विजयी करून त्यातील एक घंटा गाडी आणून आढळराव नावाचा कचरा त्याच गाडीत टाकून कायमचा बाजूला करा असा टोलाही राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.
---------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
Avinash dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा