....अखेर चाकण ग्रामपंचायत आमदार मोहितेंच्या ताब्यात
....अखेर चाकण ग्रामपंचायत आमदार मोहितेंच्या ताब्यात
सरपंचपदी दतात्रेय बिरदवडे बिनविरोध
सर्व सदस्य आमदारांच्या वळचणीला
चाकण:
चाकण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अखेर आज( दि.15) दतात्रेय बिरदवडे यांची बिनविरोध निवड झाली. गेले अनेक दिवस टांगणीला लागलेला सरपंच निवडीचा विषय आता निकाली निघाला असून गेले चार महिने याच मुद्यावरून चाकण ग्रामपंचायतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरु होती. उपसरपंच पदी प्रीतम परदेशी यांच्या निवडी नंतर आता सरपंच पदी बिरदवडे यांच्या निवडीने चाकण ग्रामपंचायतीवर आमदार दिलीप मोहिते यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या सरपंच-उपसरपंच निवडणुकीत आमदार गटाला पराभवाचा धक्का मिळूनही त्यांनी नंतरच्या काळात सर्वच सदस्यांची मोट बांधण्यात आपली शक्ती पणाला लावली होती. सुरुवातीला संख्या बळ नसतानाही बाजार समिती प्रमाणेच चाकण सारखी ग्रामपंचायतही ताब्यात घेत आमदार दिलीप मोहिते यांनी राजकारणात आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले आहे.
या बाबत चे सविस्तर वृत्त असे कि, 24 जुलै रोजी चाकण ग्रामपंचायतीचे सरपंच काळूराम गोरे यांच्या विरूद्धचा अविश्वास ठराव 15 विरूद्ध 1 मताने मंजूर झाला होता, मात्र या अविश्वास ठरावाला आव्हान देऊन ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बेकायदेशीर आहे असा मुद्दा मांडून सरपंच काळूराम गोरे यांनी त्या निर्णयावर जिल्हाधिकार्यांकडे हरकत नोंदवीत अपील केले होते. त्यावर जिल्हाधिकार्यांनी निर्णय दिला व हरकतीचा अर्ज फ़ेटाळून लावला आहे. त्या हरकतीवर जिल्हाधिकारी पुणे यांनी निर्णय देताना 24 जुलै रोजी झालेल्या अविश्वास ठरावाचे कामकाज कायम ठेवले होते .या बाबतचे पत्र त्यांनी चाकण ग्रामपंचायतीला पाठविले होते. त्यानंतर चाकणच्या सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र सरपंच गोरे यांनी या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. याच दरम्यान 17ऑगस्ट रोजी सरपंच निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती मात्र अचानक मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश प्राप्त होताच नाट्यमय रित्या ही निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली होती . मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरपंच गोरे आठ अ उतारे प्रकरणात अडकून तुरुंगात गेल्याने सरपंच पदाच्या निवडीचा मार्ग एका अर्थाने मोकळा झाला होता. दरम्यान नंतर न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे आज (दि. 15) चाकण च्या सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याचे खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी जाहीर केले होते.
त्याप्रमाणे आज चाकण ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी आर.एस.मोराळे यांनी सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली. सरपंच पदासाठी नामनिर्देशन स्वीकारण्याच्या सकाळी 10 ते 11 या वेळेत आमदार दिलीप मोहिते समर्थक ग्रामपंचायत सदस्य दतात्रेय बिरदवडे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे दतात्रेय बिरदवडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मोराळे यांनी दुपारी बारा वाजता जाहीर केले. यावेळी तुरुंगात असलेले मावळते सरपंच काळूराम गोरे वगळता सर्व सदस्य ग्रामपंचायतीत उपस्थित होते .बिरदवडे यांच्या निवडीची घोषणा होताच आमदार समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या संपूर्ण निवडणुकीवर सुरेखाताई दिलीप मोहिते स्वत लक्ष ठेवून होत्या, निवड झाल्याचे जाहीर होताच सुरेखाताई मोहिते व डॉ. शैलेश मोहिते चाकण ग्रामपंचायतीत दाखल झाले. आमदार समर्थकांनी चाकण शहरातून वाद्यवृंदाच्या दणदणाटात , फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली होती. चाकण च्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच बिरदवडे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. चाकण पोलिसांनी यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
--------------------
:अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा