बजाज ऑटो कंपनीच्या आंदोलनास हजारो कामगारांचा पाठींबा
चाकण मधील मेळाव्यास भव्य प्रतिसाद
कोळसे पाटील व खा. आढळरावांची बजाजवर तीव्र टीका
चाकण:अविनाश दुधवडे
चाकण औद्योगिक क्षेत्रातील बजाज ऑटो कंपनीच्या आंदोलनाला आज (दि.7) चाकण एमआयडीसी मधील विविध कामगार संघटनांनी , खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील आदींनी जाहीर पाठींबा दिला. चाकण येथील विष्णू लक्ष्मी मंगल कार्यालय येथे श्रमिक एकता महासंघाच्या वतीने झालेल्या मेळाव्यात खा.आढळराव ,कोळसे पाटील यांनी बजाज ऑटो कंपनीचे व्यवस्थापन व मालकांच्या च्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला.
बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांनी गेल्या तेरा दिवसांपासून (दि.25 जून ) 'काम बंद' आंदोलन सुरु केले असून , 14 कामगारांची सुरु असलेली चौकशी थांबवावी ,बडतर्फी, चौकशी, बदल्यांची कारवाई , मागे घेण्यात यावी ,कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे समान वेतन मिळावे , वेतनवाढ करार करावा आदी मागण्यांसाठी आकुर्डी येथील मुख्यालयात सुरु असलेल्या आंदोलनात आज चाकण भागातील विविध कामगार संघटनांनी सहभाग घेतला आहे. यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणले की, राहुल बजाज यांची भूमीका संशयास्पद आहे. कामगारांना वाऱ्यावर सोडून त्यांना कंपनी चालविता येणार नाही. पोलिसांना हाताशी धरून कामगारांवर दाखल करण्यात येणारे गुन्हे दुर्दैवी असून त्यांनी वेळीच तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. त्यांनी केंद्र शासन ,राज्य शासन , मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधींवरही सडकून टीका केली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या वेळी म्हणाले की, आंदोलन करण्यास जर कुणी विरोध करणार असेल तर यापुढील आंदोलन थेट बजाज ऑटो कंपनीच्या प्रवेशद्वारावर करण्यात येईल. राहुल बजाज यांचा उल्लेख 'वळू ' असा करून त्यांच्यावर तीव्र शब्दात टीका करून ते म्हणाले की, कामगारांच्या जीवावर मोठे होऊन त्यांच्या न्याय मागण्या धुडकावून त्यांना उद्योग चालविता येणार नाहीत. कामगारांवर गुन्हे दाखल करताना व्यवस्थापनाच्या विरोधात देण्यात आलेल्या तक्रारींबाबत काय कारवाया केल्या याचा खुलासा पोलिसांनी करावा अशी मागणी केली. या आंदोलनाला सर्व प्रकारची मदत करून कामगार व उद्योग हे दोन्ही जिवंत राहावेत यासाठी योग्य ती तडजोड करण्यासाठी आपण पुढाकार घेवू असेही या वेळी सांगितले . यावेळी पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले,सचिव केशव घोळवे, उपाध्यक्ष दत्ताजी येळवंडे , अविनाश वाडेकर, मारुती जगदाळे, सारिका भोसले आदिनीही बजाजच्या धोरणावर यावेळी बोलताना सडकून टीका केली. यावेळी बजाज ऑटोच्या कामगारांसह तब्बल तीन ते चार हजार कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन दतात्रेय तरटे यांनी केले.
आंदोलन करायचे कुठे? :
बजाज ऑटो कंपनी चाकण मध्ये असताना आंदोलन आकुर्डी येथील मुख्यालयात सुरु करण्यात आले होते. या बाबत मारुती भापकर अविनाश वाडेकर यांनी आपल्या खास शैलीत प्रश्न उपस्थित केला की, चाकण पोलीस येथे आंदोलन करू देत नाहीत , निगडी पोलीस म्हणतात तेथे आंदोलन करू नका मग आता दोन्ही पोलीस ठाण्यात किंवा येरवडा कारागृहात आंदोलन सुरु केले पाहिजे. त्यावर खासदार आढळराव यांनी सांगितले की, पुढील दोन दिवसात कामगार आयुक्त काय निर्णय घेतात ते पाहू अन्यथा थेट चाकण येथील बजाज ऑटो च्या गेटवर आंदोलनास सुरुवात करू.
----------------
फोटो :बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांना पाठींबा देण्यासाठी चाकण मधील मेळाव्यास उपस्थित कामगार (छाया:अविनाश दुधवडे,चाकण)
---------------------------
Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा