खराबवाडीत एलपीजी गॅस टॅंकरचा विचित्र अपघात

खराबवाडीत एलपीजी गॅस टॅंकरचा विचित्र अपघात

एक ठार; एक जखमी
प्रवाहित तारा तुटल्याने पाच तास वीज खंडित
सुदैवाने टळला मोठा अनर्थ

चाकण:अविनाश दुधवडे
 चाकण - तळेगाव राज्य मार्गावर खराबवाडी (ता.खेड) येथे आज (दि.10) सकाळी सातच्या सुमारास शिक्रापूर कडे जाणाऱ्या भारत गॅसच्या एलपीजी गॅस टॅंकरची  उभ्या टेम्पोला जोरात धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार , तर एक जण जखमी झाला. गॅस टॅंकरची धडक इतकी जबरदस्त होती कि, टेम्पोला धडकल्या नंतर तो रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या विद्युत खांबाला वाकवून पुढे एका घराच्या भिंतीवर आदळला. मोठा अपघात होऊनही केवळ सुदैवानेच टॅंकरचे व्हॉल्व्ह शाबूत राहिल्यानेच गॅस गळती झाली नाही व मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक जवळपास सहा तास ठप्प झाली होती.
    गयाराम मोरया (वय 26 ,सध्या रा. खराबवाडी, मूळ रा.उत्तरप्रदेश) असे या अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव असून गॅस टॅंकर चालक यादव (पूर्ण नाव समजले नाही) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या बाबतचे वृत्त असे कि, चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी (ता.खेड) येथे हनुमान मंदिराच्या जवळ आज सकाळी सातच्या सुमारास भारत गॅसचा एलपीजी गॅस टॅंकर (क्र.एम एच 43  ए एन 2469) भरधाव वेगाने येत असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने एका टेम्पोवर (क्र. एम एच 18 एम 1582) जावून आदळला. त्याप्रसंगी कामावर जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा असलेला वरील कामगार या टेम्पोच्या खाली चिरडला जावून जागीच ठार झाला. टेम्पोला धडक दिल्या नंतर वळलेला हा गॅस टॅंकर रस्त्या लगतच्या प्रवाहित विजेच्या खांबावर, झाडावर,व शेजारच्या मारुती देवकर यांच्या घराच्या भिंतीवर जावून आदळला. या जोरदार धडकेने घराच्या भिंतीला खिंडार पडले. त्यावेळी घरात झोपलेले अनिल मारुती देवकर व अन्य कुटुंबीय केवळ नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून बचावले. मात्र घराजवळ लावलेल्या त्यांच्या दुचाकीचा (क्र.एम एच 14 ए एन 4821) या अपघातात चक्काचूर झाला.  गॅस टॅंकर चालक या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. एलपीजी गॅस टॅंकर ज्या विद्युत खांबावर आदळला त्या खांबावरून उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरु होता. या खांबाला गॅस टॅंकरची धडक बसल्यानंतर मोठे स्पार्किंग झाल्याचे संतोष देवकर , दतात्रेय देवकर,जयसिंग देवकर आदी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात घडला त्या ठिकाणा पासून अवघ्या काही फुटांवर रस्त्याच्या एका बाजूला खराबवाडीचे नवमहाराष्ट्र विद्यालय तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेची शाळा आहे. टॅंकरचे व्हॉल्व्ह सहीसलामत राहिल्याने गॅस गळती झाली नाही व मोठा अनर्थ टळला. शिक्रापूरला जाणाऱ्या या टॅंकर मध्ये 16 टन एलपीजी गॅस भरलेला होता असे भारत गॅस च्या अधिकाऱ्यांनी सांगितले .
   या अपघातानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा एक अग्नीबंब, पिंपरी चिंचवड महापालिकेचे एक रेस्क्यू वाहन व जवान तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. तीन क्रेनच्या सहाय्याने सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अपघात ग्रस्त गॅस टॅंकर दुपारी सव्वा दोन वाजनेचे सुमारास सहीसलामत बाजूला काढण्यात यश आले. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरील वाहतूक एमआयडीसी (महाळुंगे) व चाकण तळेगाव चौक येथे अडविण्यात आली होती. विजेच्या तारा तुटल्याने संपूर्ण चाकण परिसरातील विद्युत पुरवठा सुमारे पाच तास खंडित झाला होता. दुपारी बारा नंतर टप्प्या- टप्प्याने वीज पुरवठा सुरुळीत करण्यात आला. दैवबलवत्तर होते म्हणून या एलपीजी गॅस टॅंकरचा लोकवस्तीच्या भागात शाळांच्या अगदी जवळ अपघात होऊनही मोठी दुर्घटना , मोठी जिवीतहानी टळली अशी चर्चा खराबवाडी-चाकण भागात सुरु होती. या बाबत चाकण पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहंडूळे, संतोष मोरे, राजेश मोहिते,  बी.डी.लहासे अधिक तपास करीत आहेत.

रस्त्यावरील वाहतूक ठप्प :
सकाळी सातच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे चाकण -तळेगाव राज्य मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक दोन किलोमीटर अंतरावरच थांबविण्यात आली. त्यामुळे हा मार्ग जवळपास पाच ते सहा तास ठप्प झाला होता. तळेगाव,वडगाव,मुंबईहून आलेली व चाकण मार्गे पुढे शिक्रापूर , नगरला जाणारी मालवाहतुकीची वाहने ,प्रवाशांची यामध्ये मोठी गैरसोय झाली. काही वाहने एमआयडीसी मार्गे वळविण्यात आली मात्र त्या रस्त्यांवरही ओव्हर फ्लो सारखी स्थिती निर्माण झाली होती. दुपारी सव्वा दोन वाजता अपघात ग्रस्त गॅस टॅंकर बाजूला काढण्यात आल्या नंतर या रस्त्यावरील वाहतून पूर्ववत करण्यात आली.
-----------
 Avinash Dudhawade , chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)