'हिमालयीन त्सुनामी' मधून ते सुखरूप


केवळ नशीब बलवत्तर होते म्हणूनच .... 
केदारनाथहून परतलेल्या गोरे कुटुंबियांची भावना 
 'हिमालयीन त्सुनामी' मधून ते सुखरूप 
चाकण: अविनाश दुधवडे 
 उत्तराखंड येथे केदारनाथ दर्शनासाठी गेलेले व ढगफुटी व महापुरात तब्बल पाच दिवस अडकलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोपाना गोरे व त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे चाकण व  पुण्यातील यात्रेकरू सुखरूप घरी परतले आहेत.  उत्तराखंड मधील जल प्रलया नंतर त्यांच्या नातेवाइकांची चिंता गेल्या काही दिवसांपासून वाढली होती.  शिव-गौरी ट्रॅव्हल्स यात्रा कंपनीच्या वतीने एकाच कुटुंबातील नातेवाईक मंडळी (चौदा जन) चारधाम यात्रेसाठी गेले होते. सर्वच जन सुखरूप घरी परतल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला आहे. 
  केदारनाथपासून अलीकडे काही अंतरावर असलेल्या जंगलपट्टी ,गौरीकुंड येथे हे सर्वच जन प्रलयाच्या वेळी आले होते .  पुढे जाण्याच्या तयारीत असतानाच घडलेल्या प्रकारानंतर रस्ते ,पूल वाहून गेल्याने हे सर्वच जन येथे अडकून पडले होते. त्यांच्या सोबत असणारे महाराष्ट्रातील अनेक जन आधीच येथून निघाल्याने हृषीकेश-रुद्रप्रयाग रस्त्यावर कीर्तिनगर परिसरातील रिसॉर्टमध्ये अडकले होते, असे बाळासाहेब गोरे यांनी सांगितले.  17 व 18 जून रोजी जंगलपट्टी तर 19 ते 21 पर्यंत गौरीकुंड भागात अन्न पाण्याशिवाय केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलो असे बाळासाहेब गोरे व त्यांच्या पत्नी इंदुमती गोरे, भाऊजय भागीरथी गोरे,  यांनी सांगितले. पुरामुळे दूरध्वनी, मोबाईल यंत्रणा कोलमडल्याने तसेच मोबाईल चार्जिंगची व्यवस्था नसल्याने संपर्क होण्याचा कुठलाही मार्गच नव्हता.  परिसरातील नागरिकांकडून तीन दिवसांनी मिळालेले थोडेसे कच्चे हरभरे भिजवून खात डोळ्यात प्राण आणून पाच दिवस मदतीची वाट पाहत होतो, पुरात वाहिलेले ,आजूबाजूला पडलेले मृतदेह आणि आकांत पाहून जगण्यापेक्षा मरण स्वस्त असल्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत होता,  असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर या सर्वांना लष्करातर्फे उत्तराखंड भागात बचाव मोहीम सुरू करण्यातआल्या नंतर  सैन्याच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दुर्गम भागातून बाहेर काढून डेहरादून येथे एकत्र पाठविण्यात आल्या नंतर विशेष वाहनाने दिल्ली येथे आणले गेले . दिल्ली येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मदत समन्वय व निवारा केंद्रामार्फत या सर्व महाराष्ट्रातील भाविकांना महाराष्ट्र सदन येथे भोजन, निवासाची व्यवस्था करण्यात आली व आपापल्या जिल्ह्यात पोहोचविण्यात आले .आम्ही सर्वच कुटुंबीय विमानाने पुण्यापर्यंत (दि.27 रोजी)पोहोचलो असेही गोरे यांनी सांगितले. सुखरूप परतलो ते केवळ लष्करी जवानांची मदत... आणि विघ्नहर्त्या गणरायाची कृपा ...यामुळेच असे विश्वासाने सांगत या कुटुंबीयांनी गणरायाची सह कुटुंब आरती केली. यावेळी बाळासाहेब गोरे, त्यांच्या पत्नी इंदुमती गोरे , भाऊजय भागीरथी गोरे, पुतणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य सुरेश गोरे, नितीन गोरे आदी उपस्थित होते.  
----------------------
फोटो :  'हिमालयीन त्सुनामी' असे वर्णन केल्या जाणाऱ्या पूरपरिस्थितीमधून केदारनाथ जवळच्या गौरीकुंड भागात पाच दिवस अडकून पडल्यानंतरही    सुखरूप परतलेले गोरे कुटुंबीय 
--------------------------------------------------Avinash Dudhawade,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)