रक्तचंदनाची तस्करी करणारा बडा एजंट जाळ्यात

रक्तचंदनाची तस्करी करणारा बडा एजंट जाळ्यात 
ग्रामीण पोलीस व नवी मुंबई कनेक्शन होणार उघड? पाळेमुळे खोदण्याची गरज
चाकण: परदेशात पाठविण्यापूर्वी चाकण जवळ वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील गोदामात शासनाने संरक्षित केलेल्या रक्तचंदनाचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी फरारी असलेला व चाकण पोलिसांना हवा असलेल्या मुख्य आरोपी दीपक शरद जरे (वय 40, रा. नवीमुंबई) यास तब्बल सात महिन्यांनी ताब्यात घेण्यात आले आहे. चंदन तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असलेला व या गोरख धंद्यातील एजंट मानला जाणारा दीपक जरे हा चंदन तस्करीतला मोठा मासा असून त्याच्या जाळ्यात येण्याने रक्तचंदनाच्या तस्करीचे लागेबांधे संघटित आंतरराष्ट्रीय माफिया टोळ्यांशी आहेत का , ग्रामीण पोलीस दल आणि नवी मुंबईचे यात नेमके कुठले कनेक्शन आहे, अशी बरीच धक्कादायक माहिती खरीखुरी पाळेमुळे खोदल्यास उघड होण्याची शक्यता आहे. मुंबई येथे पाठविण्या पूर्वी चाकण जवळ वाकी बुद्रुक (ता.खेड) येथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेला कर्नाटक - आंध्रातून आणण्यात आलेला साडेसतराशे घनमीटर ,सत्तावीस टन वजनाचा व अडीच कोटी रुपये किंमतीचा शासनाने संरक्षित केलेला निर्यातबंदी असलेल्या रक्तचंदनाचा अवैध साठा चाकण पोलिसांच्या पथकाने वाकी बुद्रुक (ता.खेड) येथे सात महिन्यांपूर्वी (जानेवारी 2013 ) शिताफीने पकडला होता. त्यानंतर येथील आणखी एका गोदामात एवढाच साठा मिळून आला होता. या रक्तचंदन साठ्या प्रकरणी नवी मुंबईच्या दीपक नायडू या प्रमुख आरोपीसह खेड तालुक्यातील वाकी गावचे उपसरपंच दतात्रेय संतू टोपे, शिरोलीचे सरपंच रवींद्र सावंत, कैलास गेनभाऊ टोपे ,रामभाऊ नारायण टोपे (दोघे रा.वाकी,ता. खेड,जि. पुणे ) व नवीमुंबई येथील हरी निकम, सीताराम जाधव, भारत प्रकाश काणे , आदींवर गुन्हा दाखल करून त्यातील फरारी आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली होती. यातील दीपक नायडू याने चाकण पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणाचा मास्टर माइंड दीपक जरे याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. व तेंव्हा पासून त्याचा शोध सुरु होता. अखेर त्याला मंगळवारी (दि.16) नवी मुंबई भागातून उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील व चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे, रमेश नाळे , राजू पवार आदींचा समावेश असणाऱ्या चाकण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे . या रक्तचंदनदाच्या झाडाच्या तस्करीत पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती या पूर्वीच उघड झाली होती. त्यावेळी कोट्यावधी रुपयांच्या डीलिंग साठी झालेली फोनाफोनी दीपक जरे याच्यासह अन्य काही जणांना झाल्याची चर्चा होती. जरे यास यापूर्वी उरण भागात जेएनपीटी बंदरात दीड कोटींचे रक्तचंदन जप्तीच्या कारवाईत सीमाशुल्क विभागाने अटक केली होती. गव्हाच्या पिठाच्या नावाखाली कंटेनरमधून दुबईला पाठविण्यात आलेला रक्तचंदनाचा कंटेनर माघारी मागवून जप्तीची कारवाई झाली होती. अशा अनेक प्रकारांमध्ये त्याचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या भागात झालेल्या कारवायांच्या कालावधीत जरे नाशिक कारागृहात 'स्थान बद्ध' असल्याचे समजते .त्यामुळे यातील आणखी काही पैलू उघडण्याची शक्यता असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. कर्नाटक ते दुबई व्हाया चाकण - जेएनपीटी ? : औषधांसह उत्तेजक गोळ्यांमध्ये वापरले जाणारे रक्तचंदन कर्नाटकच्या जंगलातून जेएनपीटीद्वारे परदेशात पोहोचत आहे. रक्तचंदनाच्या तस्करीचे कनेक्‍शन नवी मुंबईत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र हे रक्तचंदन नवी मुंबईत सुरक्षित पाठविण्यापूर्वी मुंबई पासून जवळ असलेल्या चाकण परिसरातील गोदामांमध्ये ठेवून योग्य वेळी बाहेर काढण्यात येत असल्याची बाब येथील वाकीतील गोदामांमधील कारवाई ,त्यापूर्वी खेड तालुक्यात अपघातग्रस्त झाल्यानंतर बेवासर स्थितीत आढळलेला संपूर्ण रक्तचंदनाचा ट्रक अशा मोठ्या कारवायांमुळे स्पष्ट झाली आहे. कर्नाटकमध्ये रक्तचंदनाची अनेक दुर्मिळ वने आहेत. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या मृत्यूनंतरही चंदनाची तस्करी बिनबोभाट सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. रक्तचंदनाची झाडे यंत्राने कापून ओंडके कंटेनरमध्ये भरून हे रक्तचंदन परदेशात जाण्यासाठी जेएनपीटीमध्ये पोहोचविले जाते. त्यापूर्वी ते चाकणसारख्या मुंबई पासून तुलनेने जवळ असलेल्या भागात आडबाजूंच्या गोदामांमध्ये ठेवून नंतर पुढे पाठविले जात असे . चाकण ते मुंबई दरम्यान पोलीस प्रशासनातील काही मंडळीसाठी रक्तचंदनाची वाहतूक म्हणजे दुभती म्हैस झाली होती. एलसीबीच्या तत्कालीन अधिकाऱ्यासह तीन कर्मचार्यांची यातीलच कोट्यावधींच्या मलिद्या प्रकरणी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. दरम्यान जेएनपीटीमधून आवश्यक वस्तू ,धान्य ,फळे निर्यात करण्याच्या नावाखाली ही रक्तचंदनाची तस्करी केली जाते. जेएनपीटीमध्येही कंटेनरमधील मालाचे व्यवस्थित स्कॅनिंग होत नसल्याने ते सहज येथून बाहेर पडते व दुबई पोर्टमध्ये पोहोचते. दुबई हे "फ्री पोर्ट' असल्याने तिथेही याची फारशी तपासणी होत नाही. त्यामुळे तिथून हे रक्तचंदन नंतर चीन व अन्य देशांमध्ये रवाना होते आणि उत्तेजक औषधे बनविण्याच्या कंपन्यांमध्ये पोहोचते. या उत्तेजक गोळ्या बनविण्यासाठी त्याचा वापर होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रक्तचंदनाच्या एक ग्रॅमला 25 पौंड इतका भाव सहज मिळतो असेही सांगण्यात येत आहे . त्यामुळे रक्‍तचंदनाला मागणी वाढत असून शासनाने संरक्षित केलेला निर्यातबंदी असलेल्या रक्तचंदनाची बेसुमार तोड होत आहे. ---------------------------
अविनाश दुधवडे,चाकण,९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)