*पोलीस दलातील ताण तणाव वाढतोय ..

                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
*पोलीस दलातील ताण तणाव वाढतोय .. 
*खाकी वर्दीची व्यथा ,लाचखोरीचा घट्ट विळखा   
 
चाकण : महेंद्र दुधवडे  

  चाकण च्या पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने काही महिन्या पूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्मत्या केली, 
आपल्या वीस पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये आत्महत्यांच्या फासावर लटकलेले कित्येक मृतदेह हळहळ करीत फासावरुन काढीत
नातेवाईकांच्या ताब्यात देणारे हे जिल्ह्यासह राज्यभरातील पोलीस दलातील अनेक सशक्त हात स्वतःचेच गळे घोटत असणे ही बाब संपूर्ण पोलीस 
प्रशासनाला शरमेने मान खाली करण्यास कारणीभूत ठरत असून पोलीस दलातील ताण तणाव व दिवसेंदिवस वाढती लाचखोरी या साठी उपाययोजना
करण्याचे दिव्य गृह विभागाला पार करावे लागणार  आहे.
     घरगुती ताण  तणाव ,अतिरिक्त कामाचा बोजा,त्यातून पदरी येणारी व्यसनाधीनता ,वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गंभीर आजारांनी 
जर्जर होऊन व अन्य अनेक कारणांमुळे पोलीस दलातील कणखर मंडळी पिचत असून ते आत्महत्ये सारखे आत्यंतिक टोकाचे पूल उचलत
असल्याचे वास्तव पहावयास मिळत आहे.
आत्महत्ये प्रमाणे ताणतणाव व जबाबदाऱ्या निभावताना चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत राहिलेल्या काही पोलिसांवर 
अपघातातूनही काळाने झडप घातल्याचे सर्वश्रुत आहे.चाकण मधील ही स्थिती प्रातिनिधीक असून सर्वत्र पोलिसांना अशा समस्यांनी 
अक्षरशः भंडावुन सोडले आहे.
    त्या मुळे अशा घटनांच्या मुळाशी जाऊन गृह विभागाने पक्क्या उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे अशी मागणी खुद्द पोलीस 
दादांकडूनच होत आहे.बहुतांश  पोलिस ठाण्यांत आजही पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याचे सांगण्यात येते,साध्या तक्रारी देणे हे 
पोलिसांच्या आरेराविनेशक्य होत नाही हा सर्वसामान्य नागरिकांचा आक्षेप कायम आहे. गेल्या काही वर्षांमधील कुठल्याही पोलीस 
ठाण्यामधील किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या घटना पाहिल्यास प्रकर्षाने  पोलिसांमध्ये ताण-तणाव आणि लाचखोरी किती खोलवर रुजली
आहे, हे दिसून येते. 
   कोणीही अधिकारी आले अन्‌ गेले, तरी त्यात फारसा फरक पडत नाही. कारण यावर उपाय करणे एकट्या अधिकाऱ्याकडून शक्‍यच 
नसते. आपल्या पोलिस दलाची रचना, त्यांच्या कामाचे स्वरूप, त्यांचे पगार, त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि त्यांच्याकडून 
असलेल्या जनतेच्या अपेक्षा, आदी यामागील कारणे आहेत. सतत अनिश्‍चिततेच्या वातावरणात काम करणारे पोलिस एक तर तणावाखाली
 जगतात किंवा बिनधास्त बनून लाचखोरीच्या मार्गाला लागतात. बहुतांश वेळा वरिष्ठ, सहकारी आणि यंत्रणाच त्यांना या मार्गाला
 लावते. मुळात केवळ एकट्यासाठी लाच घेणारे पोलिस फार कमी असतात. पोलिस दलात साखळी पद्धतीची लाचखोरी चालते,
 ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. "पैशासाठी बदली आणि बदलीसाठी पैसा' हे दुष्टचक्र पोलिस दलात आहे. या शिवाय 
राजकीय मंडळींचा आशीर्वाद नोकरी अथवा ठरवीक ठाणे टिकविण्यासाठी सदैव पाठीशी ठेवावा लागतोच लागतो. त्यामुळे पोलिसांना
एक तर या यंत्रणेचा एक घटक व्हावे लागते नाही, तर तणावयुक्त जीवन जगावे लागते.
  पवई येथे झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार पोलीस अधिकाऱ्याने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथे वर्षभरापूर्वी आत्महत्या
 केल्याची घटना पोलिसांच्या अस्थिर मानसिकतेचा प्रत्यय देत आहेत . 
    पोलिसांकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असतात, तशा त्या असण्यास हरकत नाही. नव्या वेतन आयोगामुळे पोलिसांचे पगार पूर्वीपेक्षा
 जरा सुधारले आहेत. त्यामुळे त्यांनी पैसे न घेता कामे करावीत, अशी अपेक्षा केली तर काय बिघडले? पण प्रत्यक्षात तसे होत
 नाही. गुन्हा दाखल न करणे, अटक न करणे किंवा अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते घेणे केवळ एवढीच पोलिसांची कमाईची क्षेत्रे राहिली 
नाहीत. ती आणखी विस्तारली आहेत. दाखला देण्यासाठी पैसे, वॉरंट बजावण्यासाठी, न्यायालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी,
 पोलिस कोठडीत घरचा डबा देण्यासाठी, मारहाण न करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी, अशा अनेक
 कामांसाठी पैसे मिळविण्याचे मार्ग पोलिसांनी शोधले आहेत. ज्यांचा गुन्ह्याशी संबंध आला, त्यांच्याकडून तर पैसे घेतले जातातच; 
पण ज्यांचा कधीच गुन्हेगारीशी कधीही संबंध आला नाही, अशा लोकांना ते गुन्हेगार नसल्याचे खरेखुरे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुद्धा 
पैसे मोजावे लागतात. पासपोर्ट काढण्यासाठी जाणाऱ्यांना हा अनुभव येतो. पोलिस ठाण्याची पायरी कधीही न चढलेल्या या 
लोकांकडूनही पैसे घेतले जात असल्याने त्यांच्या मनात पोलिसांबद्दल काय प्रतिमा निर्माण होते याची कल्पना सर्वांनाच आहे.

  अशा यंत्रणेत वावरताना आजारपण आणि ताणतणाव निर्माण होणे सहाजिकच आहे. त्यामुळे पोलिस दलात चाळिशी ओलांडलेल्या
 बहुतेक पोलिसांना कोणत्या ना कोणत्या आजाराने गाठलेले असते. लाचखोरीचा फायदा सर्वच पोलिसांना होतो असे नाही. बहुतेकांना
 मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या सरकारी वसाहतींमध्येच दिवस काढावे लागतात. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि न
 पेललेल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या शेवटी त्यांना आत्महत्येचा मार्ग दाखवितात. या दुष्टचक्रातून पोलिसांची सुटका केव्हा होणार? 
याचे उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही. 
-----

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)