सोशल मिडिया शाप कि वरदान ?
सोशल मिडिया शाप कि वरदान ?
महापुरुषांच्या फेसबुक वरील अवमानकारक पोस्ट नंतर चाकण मध्ये फोडण्यात आलेली एसटी बस |
ताब्यात घेण्यात आलेले आंदोलनाचे प्रमुख |
चाकण: अविनाश दुधवडे
सोशल नेटवर्किंगच्या प्रभावी माध्यमामुळे अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहू लागली आहेत. माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे मोबाईलमध्येही अनेक बदल झाले आहेत.
सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे, ग्रामीण भागात मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. क्षणाक्षणाला आपल्या भोवतालच्या
घटना वेगवेगळी मोबाईल वरून काढलेली आणि मोबाईल वर शेअर केलेली छायाचित्रे,वैयक्तिक माहिती,अशी इत्यंभूत माहिती ग्रामीण भागातही फेसबुक, व्हॉट्स अप ,ट्वीटर आदी. सारख्या सोशल नेटवर्किंग वर हजारो –लाखो युवक मंडळी अपडेट करताना सर्रास दिसत आहेत. मात्र एखाद्या समाज कंटकाच्या हातात हे माध्यम सापडल्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो याचा मागील आठवडाभरात पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना अनुभव आला आहे. यापूर्वी अशा सोशल साईट वरून मुजफ्फरनगर भागात वैगरे दंगली उसळल्याचे सर्वश्रुत होते मात्र हे लोन पुण्यात आणि त्यातही ग्रामीण भागात पोहचेल याचा कुणीही विचार केला नव्हता.
चाकण मधील बंदोबस्त |
सोशल नेट्वर्किंग साईट वरील महापुरुषांच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर चाकण सारख्या भागात झालेल्या हिंसक आंदोलनांनंतर तब्बल शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मध्यरात्री करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात शिरून दोनशेहून अधिक वाहनांवर तुफान दगडफेक करीत अनेकांना जखमी करणारे समाजकंटक फरारी असले आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सोमवंशी, वाकीचे उपसरपंच पप्पू उर्फ योगेश टोपे , यांच्यासह बारा आंदोलक गेल्या आठवडाभरापासून गजाआड झाले आहेत. या सर्वांची रवानगी सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात झाली आहे. पुण्यातील हडपसर मधील मुस्लीम तरुणाचा खून , काही भागात प्रार्थनास्थळांची मोडतोड, पिंपरी-चिंचवड ,मावळ, हवेली, खेड तालुक्यातील प्रचंड तणाव आणि चाकण लगतच्या भागातील भागातही सोशल मिडिया वरील त्या 'पोस्ट' चा परिणाम आणि जोरदार धुमश्चक्री याचा मागील आठवडाभर सर्वाना अनुभव आला .
मुस्लीम समाजानेही केला महापुरुषांच्या अवमानाचा निषेध |
विविध जाती धर्माच्या भावना भडकावून सर्वसामान्यांची सुरक्षितता धोक्यात आणणार्या सोशल मीडियामुळे सामाजिक सलोख्याच्या वातावरणाचा घात होईल की काय अशी भीती आता शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही निर्माण झाली आहे. सोशल नेटवर्किंगचा वापर युवकांमध्ये एवढा वाढला आहे, की अनेक जण तासन् तास आपला वेळ इंटरनेटवर घालवताना दिसतात. एक तास, एक दिवस जर इंटरनेटची सेवा कोलमडली तर काय होईल? याचा विचार न केलेलाच बरा इतक्या टोकाला ही परिस्थती पोहोचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . अनेक जण फेसबुक , व्हॉट्स अप ,ट्वीटर आदींवर पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत अपडेट करत असतात. इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाढदिवसापासून ते सर्दी, खोकला झाल्याचे सर्वात प्रथम सोशल नेटवर्किंगवरील मित्रांना समजते, त्यानंतर घरात व्यक्तींना माहिती होते अशी विपर्यस्त स्थिती निर्माण झाली आहे . अन्न, वस्त्र,
निवारा याप्रमाणे इंटरनेट ही निमशहरी व ग्रामीण भागातही काळाची गरज होऊन बसली आहे. ई-मेल तपासणे, जगभरातील माहिती घेत राहणे यासाठी इंटरनेटचा वापर
योग्य आहे. गेल्या काही वर्षांपासून सोशल नेटवर्किंगचा वापर शहरी युवा पिढीमध्ये प्रमाणेच ग्रामीण युवकांमधेही मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे . मोबाईल सारख्या माध्यमातून तासंतास सोशल नेटवर्किंगचा वापर करणारे हजारो युवक ग्रामीण भागातही पहावयास मिळत आहेत.या वापरामागे विविध कारणेही आहेत. यामुळे अपडेट राहायला मदत होते. शिवाय, नवनवीन माहिती मिळण्यास मदत होतेच मात्र आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ व मित्रांशी अनोख्या संवादाचे माध्यम मिळाल्याचा विशेष आनंद ग्रामीण युवकांमध्ये पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हा परिषद ते अगदी आमदार - खासदारां पर्यंत अनेक नेते - कार्यकर्ते इमेज बिल्डिंगसाठी या सोशल साईटचा खूप मोठा वापर करीत असल्याचेही सर्वश्रुत आहेच. त्यामुळे सोशल नेटवर्किंग हे अनेकांसाठी एक व्यसन होऊन बसले आहे. त्याचाच फायदा समाजकंटक घेत आहेत. त्यामुळे या व्यसनाच्या आहारी जायचे आणि समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांचे इस्पित साध्य करून द्यायचे की केवळ सकारात्मक वापर करायचा हे प्रत्येकाने ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे.
तर पोस्टमॉर्टेम कराच :
सोशल मिडिया वापरण्याचे स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा हक्क आहे. परंतु घटनेनेच याच्या मर्यादाही स्पष्ट केलेल्या आहेत. घटनेच्या कलम १९ (२) अन्वये ज्या कृतीमुळे भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, देशरक्षण, सुव्यवस्था, न्यायालयीन सन्मान, गुन्ह्याला प्रवृत्त न करणे ही मूल्ये पायदळी तुडविली जातात. त्या प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे. कारण लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्भयपणे आणि कर्तव्यबुद्धीने काम करावे लागते. सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना, राष्ट्रीय मूल्यव्यवस्था विस्कटण्याचा प्रयत्न होत असेल, तर सरकार व समाज दोघांनाही स्वस्थ बसून राहता येणार नाही. त्यामुळे सरकारने त्याची जबाबदारी पार पाडावी हे जेवढे खरे आहे, त्याप्रमाणेच लोकांनीही समंजस सहभाग दिला पाहिजे. परदेशातून अशा सोशल साईट वर पडलेल्या पोस्ट वरून जर पुण्यात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हिंसाचार होत असेल तर समूह भावनेशी कसा संवाद निर्माण करायचा हा गंभीर प्रश्न तयार होतो. सध्याच्या या संदर्भातील कायद्यातही सुयोग्य बदल केले पाहिजेत, सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांनी स्वयंनियंत्रणही पाळले पाहिजे आणि सोशल मीडियाला ते अशक्य असेल तर वेळेवर सोशल संकेतस्थळांचे आवश्यक ते पोस्टमॉर्टेम व्हायलाच हवे आणि धार्मिक दंगलींचा राजकीय फायदा घेण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल तर त्यांचेही बुरखे टराटरा फाडले पाहिजेत अशी सामन्यांची भावना आहे.
बोगस अकांऊंटचा सुळसुळाट :
सोशल मीडियामध्ये जनमत घडवण्याची, प्रसंगी सत्तापालट करण्याचीही क्षमता असल्याची प्रचीती सर्वांनाच आली आहे. पण या ऑनलाइन साधनांचा प्रभावीपणे वापर संस्कृतीला नवे वळण देणारी ही अवस्था जितकी उत्साहवर्धक आहे, तितकीच कुठलीही जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वांचीच जबाबदारी वाढवणारीही आहे. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेतच ,मात्र या फायद्या-तोट्याचे गणित एवढी प्रचीती येवूनही तितकेसे गांभीर्याने घेतले जात नाही. सोशल मीडियावरची कुठली माहिती ही गंभीरपणे घेण्याच्या लायकीची आहे आणि कुठली नाही याचा सारासार विचारच होत नाही. मोबाईल वर तयार करण्यात आलेली कपोलकल्पित माहिती बोगस अकांऊंटच्या माध्यमातून अनेकांच्या मोबाईलवर आदळत असेल तर त्याच्या अस्सलपणाची खात्री कोण देणार आणि ती खात्री करून तरी कशी घ्यायची? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
------------------------------ ------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा