खेड तालुक्यातील खून प्रकरणात मुंबईच्या आरोपीस जन्मठेप
खेड तालुक्यातील खून प्रकरणात मुंबईच्या आरोपीस जन्मठेप
तीन वर्षांपूर्वीच्या आव्हाटच्या खूनात सत्र न्यायालयाचा निकाल
पोलिसांच्या श्वानाने केला होता आरोपीकडे निर्देश
गुन्हे शोधक श्वान ‘राणी’ ची महत्वाची भूमिका
चाकण:
पोलिसांनी मांडलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावणा-या पुण्याच्या सत्र न्यायालयाने पोलिसांच्या श्वानाने दिलेल्या पुराव्यावरही शिक्कामोर्तब करून खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली , त्यामुळे खेड तालुक्यातील आव्हाट गावी तीन वर्षापूर्वी मुलगा गमावलेल्या ६५ वर्षांच्या वृद्ध मातेला न्याय मिळाला आहे. या क्रूर खून खटल्यात वृद्ध मातेच्या न भिता देण्यात आलेल्या निर्भय साक्षी सोबतच पोलिसांच्या गुन्हे शोधक श्वान पथकातील ‘राणी’ श्वानाने काढलेला माग व तपासणीवेळी आरोपीकडे थेट केलेल्या निर्देशाने या खटल्यात महत्वाची भूमिका बजावली.
मित्राच्या मावसबहिणीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाची वाईट नजर असल्याच्या संशयावरून मैनुद्दीन इमामुद्दीन शेख (२३, रा. आव्हाट, शेरेवाडी, ता. खेड, मूळ रा.वडाळा मुंबई) याने १७ एप्रिल २०११ रोजी धर्मा खंडू बुरुड (वय ३२ रा. आव्हाट, ता. खेड,जि.पुणे ) याचा राहत्या घरासमोरील अंगणात खून केला होता. त्या प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयाने मैनुद्दीन इमामुद्दीन शेख यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि,आरोपी शेख आणि बुरुड कुटुंबीय यांचा शेजारी राहणारे शिवाजी वाळुंज हे दोघे मित्र होते. शेख आणि वाळुंज हे दोघे मुंबई येथे एका कंपनीत कामाला होते. ते दोघेही मुंबईत एकत्रित रहात होते . मात्र, काही दिवसांनी वाळुंज आपल्या गावी (आव्हाट, शेरेवाडी, ता. खेड ) येथे आला . आरोपी शेख 'तुझ्या गावी यायचे आहे,' असे सांगून वाळुंजच्या घरी गावी आला होता. आरोपी शेख वाळुंज यांच्या कुटुंबीयांबरोबर राहू लागला. तो त्यांच्याबरोबर शेतात काम करत असे. वाळुंजची मावसबहीण त्यांच्याकडे शिकायला होती. वाळुंज याच्या घरी बुरुड कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा धर्मा यांचे येणे-जाणे होते. आरोपी शेखला धर्मा बुरुड हा मित्राच्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहतो, असा संशय होता. धर्मा शिवाजीच्या नातेवाईक महिलेची मस्करी करत हे खुद्द शिवाजीला सुद्धा आवडत नव्हते. ही बाब त्याने शेखला सांगितली. मात्र वाळुंजच्या घरातील अन्य कुटुंबीयांनी त्यांना धर्मा चांगला मुलगा असल्याचे समजावले होते. मात्र शेख यास संशयाने पक्के पछाडले होते. त्याने धर्मा याचा काटा काढण्याचा निश्चय केला. व तो योग्य संधीच्या शोधात होता. घटनेच्या दिवशी (१७ एप्रिल २०११ रोजी) रात्री धर्मा आपल्या घराबाहेर खाटेवर झोपलेला असताना शेखने रात्री त्याला पहारीने भोकसले शरीरावर जबरदस्त वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र तत्पूर्वी धर्माची जोराची किंकाळी व आवाज ऐकून त्याची आई सुंदराबाई खंडू बुरुड ( वय ६५) बाहेर आली. तिने शेखला पळून जाताना पाहिले होते, व धर्मा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. धर्माची आई सुंदराबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळी पाचारण करण्यात आलेल्या श्वान पथकातील घटनेच्या ठिकाणी शेखची चप्पल सापडली. श्वानपथकानेही श्वानाला आरोपीच्या चपलेचा वास दिल्यानंतर श्वानाने थेट आरोपी शेख रहात असलेल्या वाळूंज कुटुंबियांच्या घराकडे धाव घेतली व आरोपीच्या घराचा माग काढला होता.
धर्माच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्याचा खून झाल्याच्या प्रकाराचा धक्का त्याच्या आईला बसला होता. त्यामुळे न्यायालयात केसची सुनावणी सुरू झाल्यानंतरही ती दीड वर्षे कोर्टात साक्ष देण्यास हजर झाली नव्हती. मात्र अखेर कोर्टात हजर झाल्यानंतर त्यांनी पाहिलेला सर्व प्रकार न भिता कथन केला श्वान पथकाची साक्ष झाली व पुण्याचे सत्र न्यायाधीश यू. एन. दिक्कतवार यांच्या कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल दिला . याप्रकरणी सरकारी वकिल रमेश घोरपडे १२ साक्षीदारही तपासले होते .
तीन महिने श्वान पथकाची साक्ष:
या संपूर्ण खटल्यात पोलिसांच्या गुन्हे शोधक श्वान पथकाची महत्वाची भूमिका राहिली. या बाबत पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे गणेश भगवान फापाळे यांनी सांगितले कि, गुन्हे शोध श्वान पथकातील राणी या श्वानाने घटना स्थळापासून आरोपीचा माग काढला होता. या बाबत श्वान पथकाची पुण्याच्या सत्र न्यायालयात तब्बल तीन महिने साक्ष चालली होती. त्यानंतर न्यायालयाने या बाबतचा निकाल दिला व आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
--------------- अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा