माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार.....

माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार यांचा पाचवा स्मृतिदिन ....


सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी, शेतमजुर , व्यापारी , कामगार व युवक हे सार्वजनिक जीवनात केंद्गबिंदु मानून त्यांच्याशी जवळीक साधुन त्यांच्यासंस्कृती, त्यांची जीवनशैली, त्यांचे प्रश्न , दैनंदिन संसारातील अडीअडचणी, सुख-दुःख, सणवार, यात्रा, उत्सव, हरिनाम सप्ताह, लग्न व इतर समारंभ या सर्व गोष्टीमध्ये  न चुकता व हिरीरीने भाग घेणारे ,राजकारणातील मित्र व जेष्ठ कार्यकर्ते यांचे प्रेम जपण्याचे कामकाम अविरत पणे करणारे खेडचे सलग चार वेळा आमदार राहिलेले कार्यसम्राट लोकप्रिय यांच्या पाचव्या स्मृती दिना निमित्त ....


  खेड तालुक्यातील कुठल्याही गावाची यात्रा असो, या भागातील  गणेशोत्सव असो,लग्नसमारंभ असो , किंवा विविध गावांचा  गावचा हरिनाम सप्ताह असो दिवंगत माजी आमदार नारायण पवार आपल्या पक्षाचे पदाधिकारी,मित्र परिवारासह  सहभागी होणारच अशी त्यांची येथे ख्याती होती . मुस्लिम बांधवांचा ईदनिमित्त कितीही सामान्य गरीब व लहान कार्यकर्ता असला तरीही त्याच्या घरी जाऊन शिरखुर्मा खाण्यासाठी आठवणीने जाणारा नेता  ,जागरण गोंधळ, लग्नकार्य किंवा यात्रा प्रसंगी ते कार्यकर्ते आणि मित्रांच्या घरी जेवायला जाऊन सर्वांच्या सोबत हसत खेळत, गप्पा करत , रोजच्या अडीअडचणींची चर्चा करत सर्वांना आपलेसे करण्याचा स्वर्गीय नारायण पवार यांचा स्वभाव होता. सामान्य नागरिकांनी कुठल्याही मध्यस्था शिवाय थेट आपल्या कडे काम आणावे असा त्यांचा स्वभाव तालुक्याला परिचित होता.  खेडच्या पूर्व पट्ट्यातील असूनही पश्चिम पट्ट्यातील जनता म्हणूनच नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीआणि सलग वेळा त्यांना महाराष्ट राज्याच्या विधान सभेत पाठविले.  स्वर्गीय माजी आमदार पवार यांची मित्र मंडळीही सर्वसामान्य घरातील ,सर्व समाजातील आणि कष्टकरी गोरगरीब थरातुनच जास्त होती.. हे सर्व करीत असतांना आपण समाजाशी बांधील आहोत व समाजाचे देणे लागतो, त्यातुन उतराई होतांना एखादा गरीब निराधाराचे प्रकरण असो अथवा घरकुलाचे काम असो, किंवा कसल्याही प्रकारची लागणारी मदत असोस्वतः त्यामध्ये पाठपुरावा करून त्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न केला.  सर्वसामान्य माणसाने अडीअडणीची साधी चिठ्ठी जरी खिशात दिलीतरी पत्र रूपाने ते पाठपुरावा करून  प्रशासनाच्या  माध्यामातून  निश्चित करणारच. राजकारणाच्या रोजच्या एवढ्या व्यापातही समाजोपयोगी  शिबीरे , विविध सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे  सामाजिक उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबवीत होते..  सर्व गोष्टीत सामाजिक बांधीलकी ठेवुन स्वर्गीय माजी आमदार पवार यांनी  कधीही राजकारण आणले नाही . आणि राजकारणातील विरोधकांना वैयक्तिक पातळीवर त्रासही दिला नाही. त्यांच्या कडे असलेल्या विकासाच्या दूरदृष्टी मुळेच राज्य शासनाच्या प्रकल्पांना येथे वाव मिळाला व येथे सुरुवातीला कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवली गेली. विरोधी पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्या सोबत आल्याचे  तालुक्यात अनेकदा पहावयास मिळाले होते. समाजातील विविध  घटकांना त्यांच्या सामाजिक उत्साहात सहभागी होऊन त्यांना आपलेसे करणारा व लोकसंग्रहातुन लोकमान्यता मिळविणारा सर्वसामान्यांचा असामान्य नेता म्हणुन खेड तालुक्यातील जनता नेहमीच त्यांचा आदर करते. 

राजकीय वाटचाल :
माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार यांची राजकीय वाटचाल वडगाव घेनंद ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सुरु झाली. पुढे ते खेड पंचायत समितीचे सदस्य, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, खेड कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे ३९ वर्षे संचालक व तीनदा सभापती राहिले. भूविकास बँकेचे व पुणे जिल्हा माध्यवतीबँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. १९८५ ते २००४ पर्यंत सलग चार वेळा आमदार होत त्यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एस. कॉंग्रेस , आय कॉंग्रेस , व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून तालुक्याचे प्रतिनिधित्व केले . खेड बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी १६ फेब्रुवारी १९७६ ते २३ ऑगस्ट १९७९ , तदनंतर १९ ऑक्टोबर १९८२ ते १७ जून १९८३ व २७ डिसेंबर १९९१ ते २४ फेब्रुवारी १९९७ असे तीन वेळा प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्राच्या विधानसभेत खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून १९८५ ते १९९०,   १९९० ते १९९५  ,   १९९५ ते २००० व  २००० ते २००४ असे सलग चार वेळा आमदार म्हणून बहुमताने निवडून आले.  त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी विधानसभेच्या सहा निवडणुका लढल्या . त्यातील सर्वात पहिल्या म्हणजे १९७७ सालच्या निवडणुकीत आणि सर्वात अखेरच्या म्हणजे २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 
अनेकदा तालुक्याचे प्रतिनिधित्व करूनही राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्या बद्दल जाहीर नाराजी व्यक्त करीत  त्यांनी २००४ सालच्या अखेरच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठींब्यावर अपक्ष म्हणूननिवडणूक लढवीत शरद पवारांची साथ सोडली होती.   २ फेब्रुवारी १९४२ रोजी जन्म झालेल्या स्वर्गीय आमदार नारायण पवार यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी १३ नोव्हेंबर २००८  साली निधन झाले.  त्यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली ...


अविनाश ल. दुधवडे (पत्रकार) चाकण ९९२२४५७४७५
Avinash L. Dudhawade,chakan, 9922457475 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)