चाकणचे माजी सरपंच गोरे यांना अखेर जामीन मंजूर

चाकणचे माजी सरपंच गोरे यांना अखेर जामीन मंजूर

न्याय मार्गाने लढा देणार : गोरे  
चाकण:वार्ताहर
 बांधकाम नोंदी व नमुना नंबर आठ चे उतारे या संदर्भात पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने पोलिसांत गुन्हा दाखल होऊन गेल्या तीन महिन्यांपासून गजाआड असलेले चाकणचे माजी सरपंच काळूराम गोरे यांना अखेर न्यायलयाने जामीन मंजूर केला असून त्यांची मंगळवारी पुण्याहून त्यांची मुक्तता झाली आहे .
     सरपंच गोरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून 'आठ अ' चे बोगस उतारे देवून बेकायदा कामकाज केल्याप्रकरणी चाकणच्या सरपंचांवर येथील पोलीस ठाण्यात (19 जुलै रोजी) खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीकांत ढमढेरे यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल आला होता.  दि.20 ऑगस्ट रोजी चाकण पोलिसांनी त्यांना  अटक केली होती तेंव्हापासून सरपंच गोरे गजाआड होते. या प्रकरणाच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनेकांच्या भोवती फास आवळले होते. सरपंच काळूराम गोरे, चाकण ग्रामपंचायतीचे अधीक्षक विजय भोंडवे , उतारा मिळविणारा इसम पांडुरंग सपाट यांच्यासह आयफील सिटी या गृहप्रकल्पाचे मालक संतोष मोतीलाल भन्साळी, राहुल हृतिक नहार ,याच गृहप्रकल्पातील कामगार मधुकर शंकर वाडेकर , व सदगुरू बिल्डर्स या बड्या गृहप्रकल्पाचा मालक , जमीन व्यवहारातील एक एजंट यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.  त्यातील काहीना अटक करून जमीन मिळाला ,तर काही मंडळी गेल्या तीन महिन्यापासून अटकपूर्व जमीन मिळवीत आपली अटक अद्याप पर्यंत टाळली आहे. 
 चाकण पोलिसांकडून अटकेची कारवाई होण्यापूर्वी तत्कालीन सरपंच गोरे यांनी यात राजकीय द्वेषाने अडकविण्यात येत असल्याचा व ठरावाला सर्वांची संमती असताना एकट्याला टार्गेट करण्यात येत असल्याचा मुद्दा  प्रशासनासमोर उपस्थित केला होता. यासाठी त्यांनी चाकण ग्रामपंचायतीच्या  दफ्तर तपासणी नंतर अधिकाऱ्यांनी सरपंचांसह सर्वच जण दोषी असल्याच्या दिलेल्या अहवालाकडे लक्ष वेधले होते. तदनंतर त्याच दप्तर चौकशीच्या अहवालाचा आधार घेत पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठरावाला मंजूरी देणाऱ्या सर्व सदस्यांना नोटीसा काढल्या होत्या , प्रत्यक्षात या नोटीसा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या सर्व सदस्यांना पोस्टाने या नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या.
  या बाबत चे सविस्तर वृत्त असे कि,  24 जुलै रोजी चाकण ग्रामपंचायतीचे सरपंच काळूराम गोरे यांच्या विरूद्धचा अविश्‍वास ठराव मंजूर झाला होतामात्र या अविश्‍वास ठरावाला आव्हान देऊन ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बेकायदेशीर आहे असा मुद्दा मांडून सरपंच काळूराम गोरे यांनी त्या निर्णयावर सुरुवातीला जिल्हाधिकार्‍यांकडे  नंतर मुंबई उच्च  न्यायालयात हरकत नोंदवीत अपील केले होते .  याच दरम्यान  17 ऑगस्ट रोजी सरपंच निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती मात्र अचानक मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश प्राप्त होताच नाट्यमय रित्या ही निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली होती .   मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तत्कालीन सरपंच गोरे आठ अ उतारे प्रकरणात अडकून तुरुंगात गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांना या प्रकरणातून सोडविण्याच्या बदल्यात मुंबई उच्च न्यायालयातून सरपंच निवडीच्या विरोधात दाखल केलेल्या प्रकरणातून माघार घेण्याचे आपसात ठरविण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर पार पडलेल्या चाकण च्या नूतन सरपंच पदाच्या निवडणुकीने त्यास पुस्तीही मिळाली होती. प्रत्यक्षात गोरे यांना या प्रकरणात तब्बल तीन महिने तुरुंगात राहावे लागले. राजकीय सूडबुद्धीने मला प्रशासन हाताशी धरून नियोजन पूर्वक अडकविण्यात आले , न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याने व या बाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याने न्याय मार्गाने लढा देण्यात येणार असल्याचे चाकणचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काळूराम गोरे यांनी सांगितले. 
------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)