...त्या आगीची झळ चाकणच्या नगरपालिका प्रस्तावाला 
 मंत्रालय आगीत चाकण नगरपालिकेचा प्रस्ताव खाकच
 नगरपालिकेसाठी चाकण करांना करावा लागणार वेट
 प्रशासन म्हणते प्रस्ताव नव्याने मागविले
 ---------------------------- मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या नगर विकास खात्याच्या दालनात सर्वप्रथम आग लागल्याने चाकण नगरपालिकेचा नगर विकास विभागाच्या उपसचिवां कडून स्वाक्षरी झालेला प्रस्ताव याच विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात मंजुरीसाठी असताना जळून खाक झाला आहे.यास याच विभागाचे मंत्रालयातील उपसचिव ए.एस.जीवने यांनीही दुजोरा दिला असून दृष्टीपथात आलेल्या चाकण च्या नगरपालिकेचे घोंगडे आणखी किती दिवस भिजत पडणार असा यक्ष प्रश्न चाकणकरां समोर उभा ठाकला आहे. राज्यातील तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या आणि मोठ्या ग्रामपंचायतींचे नगरपालिका किंवा नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याची घोषणा राज्यशासनाकडून वारंवार होत असली तरी त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न होतात का? हा संशोधनाचा विषय झाला आहे.औद्योगीकारणाने विस्तारत्या शहरांमध्ये शासनाच्या या दुटप्पी भूमिकेने अनेक असुविधा पहावयास मिळत असून चाकण सारखा भाग हा अशाच समस्येच्या गर्तेत आला आहे.जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेने याच वर्षी मार्च महिन्यात या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्यास मजुरी दिली आणि हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला . मात्र हा प्रस्तावच मंत्रालयाला लागलेल्या आगीत जाळल्याच्या वृत्ताला मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असल्याने चाकण च्या नगरपालिकेचा प्रश्न आणखी लांबणीवर पडणार आहे.आगीच्या घटनेपूर्वी तीन दिवस आधीच( दि.19 जून ) हा प्रस्ताव उपसचिवांच्या स्वाक्षरी नंतर सचिवांच्या स्वाक्षरी साठी ठेवण्यात आला होता.तदनंतर हा प्रस्ताव अंतिम आदेशासाठी मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवण्यात येणार होता. वाढत्या लोकसंखेच्या पार्श्वभूमीवर किमान नागरी सुविधांची वणवा झाल्याचे चित्र येथे गेल्या दहा बारा वर्षां पासून निर्माण झाले आहे . समस्यांच्या गर्तेतील चाकण करांनी ग्रामसभेत चाकणला नगरपालिका करण्यात यावी, असे ठराव आजवर अनेकदा सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्या मुळे ग्रामपंचायतीने विशेष सभा घ्यावी, असे आदेशपत्र थेट जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या नंतर सहा महिन्यांपूर्वी चाकणला विशेष गामसभेत या विषयावर चर्चा होऊन नगरपालिकेचा ठराव सर्वानुमतेमंजूर करण्यात आला. औद्योगिकीकरणामुळे चाकणची लोकसंख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. सद्य स्थितीत शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या पुढे पोचली आहे. त्यामुळे येथे पायाभूत समस्या वाढत आहेत. यामध्ये पाणीपुरवठा, कचरा, सांडपाणी, गटार, शौचालय व्यवस्था, अंतगर्त रस्ते अशा एकमेकांत गुंतलेल्या समस्यांनी सर्वसामान्य नागरिकांना भंडावून सोडले आहे. या समस्यांचे निराकरण महसुली उत्पन्न सत्तर ऐंशी लाख असणारी ग्रामपंचायत करू शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करून शासनाने त्वरित चाकणला नगरपालिका करावी, अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. याबाबत येथील युवा कार्यकर्ते निलेश कड पाटील,ऍड.सोमनाथ दौंडकर व त्यांच्या सहकार्यांच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्र्यांनाही येथील परिस्थती सांगितली होती. त्या नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नगरविकास विभागाला कागदपत्रांची पूर्तता पाहून कार्यवाहीचे आदेश दिले होते. तदनंतर जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी चाकणच्या ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून त्यामध्ये चाकणला नगरपालिका करावी, असा ठराव करण्याचे आदेशपत्र गटविकास अधिकारी यांना दिले होते. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी चाकण ग्रामपंचायतीला विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, असे आदेशपत्र दिले होते.त्या नुसार चाकण ग्रामपंचायतीने हा ठराव बहुमताने मंजूर केला होता. जिल्हा परिषदेनेही दिली होती मंजुरी : खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण या दोन ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्यास पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने याच वर्षी मार्च महिन्यात मंजुरी दिली होती . जिल्ह्यातील नवीन नगरपालिकांच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यासाठी संबंधित तालुक्‍याच्या पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची शिफारस असणे गरजेचे असते. खेड पंचायत समितीच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेने याबाबतचा ठराव मंजूर केला होता . यामुळे या दोन्ही नगरपालिकांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचा मार्ग मोकळा होऊन हे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. चाकण ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्यास पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने यासाठी तब्बल तीन वर्षाहून अधिक कालावधी घेतला होता . खेडच्या गट विकास अधिकाऱ्यांनी याबाबत शिफारस करण्याची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविला होता. जिल्हा परिषदेच्या ठरावाची प्रत त्या नंतर पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे पाठविली होती.त्या नंतर हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला होता. चाकण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह येथील काही कार्यकर्त्यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ग्रामविकास मंत्रालय ,जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषद , यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला होता.या बाबतची कार्यवाही लवकरच होण्याची शक्यता तदनंतर व्यक्त होत होती.मात्र मंत्रालयाला लागलेल्या आगीने मोठ्या मुश्कीलीने अंतिम टप्प्यात आलेला हा ठराव आणि चाकणकरांच्या अपेक्षा खाक झाल्याचे म्हटले जात आहे . मोठ्या ग्रामपंचायतींना न्याय कधी : जिल्ह्यात मोठ्या ग्रामपंचायतींची संख्या 34 आहे. मात्र त्यापैकी पाच ते सहा ग्रामपंचायतींचेच नगरपालिकेमध्ये रूपांतर करता येऊ शकणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी ,चाकण व राजगुरुनगर या दोन ग्रामपंचायतींनी जिल्ह्यात सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात सध्या खेड तालुक्यातील आळंदी सह बारामती,जेजुरी, लोणावळा, तळेगाव दाभाडे, इंदापूर, दौंड, शिरूर, सासवड, जुन्नर, भोर आदी अकरा नगरपालिका कार्यरत आहेत. राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीही केली होती. तदनंतर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसारखेड तालुक्यातील चाकण व राजगुरुनगर या दोन ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव केला होता. या दोन्ही ग्रामपंचायतींच्या ठरावानंतर खेड पंचायत समितीनेही याबाबतचा ठराव मंजूर केला होता . पुन्हा कागद पत्रांची पूर्तता करू : चाकण नगर पालिकेचा प्रस्ताव जळून खाक झाल्याने या बाबत प्रशासनाला अपेक्षित असणाऱ्या कागद पत्रांची ,ग्रामसभेतील ठरावांची पूर्तता करणार असल्याचे चाकण चे सरपंच काळूराम गोरे,उपसरपंच साजिद सिकीलकर यांनी सांगितले. प्रस्ताव पुन्हा मागविले : जीवने ए.एस. मंत्रालयातील हे प्रस्ताव जाळले असले तरी विभागीय आयुक्तांमार्फत हे प्रस्ताव पुन्हा मागविण्यात आले असून ते लवकरच प्राप्त होतील अशी माहिती मंत्रालयातील नगर विकास विभागाचे उपसचिव ए.एस.जीवने यांनी दिली.
 Avinash Dudhawade, chakan ---------------------------------------- ----------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)