खेड आळंदी मधील संग्राम ; तुल्यबळ उमेदवारांत ? 

मनीषाताई गोरे ठरणार सर्वमान्य उमेदवार ? 

खेड मध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न 

   खेड आळंदी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार या बाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आमदार दिलीप मोहिते यांच्या समोर तुल्यबळ आणि सर्व सहमतीचा उमेदवार असावा असा अनेकांचा प्रयत्न आहे. त्यातच मधल्या काळात झालेल्या बैठका आणि विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदार संघात कुठल्याही स्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून  आणण्याचा प्रयत्न खेड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांसह राज्यातील नेत्यांकडून सुरु आहे. 





   अशातच सर्वसहमतीचा उमेदवार होऊ शकेल अशा महिला उमेदवाराचे नाव आता सर्वात आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. खेड तालुक्याचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे यांच्या उमेदवारीच्या पोस्ट २ दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. 

महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची जोरदार शक्यता व्यक्त होत आहे. महविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडे डझन भर इच्छुक आहेत. त्यांच्यात उमेदवारी वरुन प्रचंड चुरस निर्माण झाली असताना शरद पवार यांनी या सर्वांना बाजुला सारुन ओबीसी प्रवर्गाच्या तेही महिला इच्छुक उमेदवाराला पुढे आणल्याने गेली काही महिने तयारी करणाऱ्या अनेकांच्या राजकीय विकेट पडल्या आहेत. 

    दुसरीकडे महायुतीच्या बाजूने लढणार असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना शह बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडी कडे इच्छुक वाढल्याने बंडखोरीची शक्यता समोर येत होती. श्रीमती गोरे यांना उमेदवारी निश्चित झाल्यास ती शक्यता धुसर होणार असल्याचे बोलले जात आहे. एकास एक लढत झाली तर महाविकास आघाडीच्या पारड्यात यश पडणार असल्याचा तमाम समर्थक कार्यकर्त्यांना विश्वास आहे. 

 खेड आळंदी विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत झाल्यास आमदार दिलीप मोहिते यांचे पारडे जड राहणार असल्याचे संकेत मतदारां मधुन मिळत आहेत. दिवंगत आमदार सुरेश गोरे हे मुळ राष्ट्रवादीचे मात्र सन २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणुक लढवली, त्यात ते यशस्वी ठरले. पुढच्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दोन्हीं निवडणुका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून लढवल्या होत्या. आता यावेळी त्यांच्या पत्नी मनीषाताई गोरे राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे. मनीषाताई गोरे यांच्या माध्यमातून खेड आळंदी विधानसभा मतदार संघात सर्वमान्य उमेदवार मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 

---------

PUNE LIVE NEWS | MARATHI

पुणे लाईव्ह न्यूज | मराठी

संपर्क | 7020373091/ 9850917070

खेड, चाकण, राजगुरुनगर, आळंदी  

KHED, CHAKAN, RAJGURUNAGAR, ALANDI

#politics, #khed , #maharashtra , #india , #journalism, #PUNELIVENEWS

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)