खेड | ठळक घडामोडी | शनिवार, ८ जून २०२४

पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
-------------
साडेपाच लाखांचा १० किलो गांजा जप्त
एकास अटक ; चाकण मध्ये कारवाई 

 

  चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी कारवाई करून तब्बल १० किलो गांजासह एकास अटक केली आहे. मारुती नागनाथ माने, वय 27 वर्षे, रा. सुकटा, ता. भुम जि. धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 5 लाख 42 हजार 40 रुपये किंमतीचा 10 किलो 510 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, मोबाईल व रोख रक्कम असा माल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक  विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, व त्यांच्या पथकाने केली आहे.
--------------
भोसे | मद्यपानासाठी पैशांची मागणी करत एकास गंभीर मारहाण
   नशा करण्यासाठी मला गांजा दे किंवा दारू पाज असे म्हणत एकाने तरुणाला शिवीगाळ करीत डोक्यात वीट मारून जखमी केले. मी इथला भाई आहे, असे म्हणत परिसरातील घरांवर दगडफेक  दहशत माजवल्याचा प्रकार चाकण जवळील भोसे ( ता. खेड ) येथे घडला आहे. गणेश धर्मराज बागल (रा. काळूसरोड, भोसे, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोन्या ऊर्फ ओंकार नवनाथ पहाड (रा. भोसे, ता. खेड ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने दोघांना काळूसरोड येथे थांबवले. गांजा दे किंवा दारू पाज, तुला येथून जाऊ देणार नाही, असे आरोपी म्हणाला. त्यानंतर यातील फिर्यादी व साक्षीदार तेथून निघाले असता, पाठीमागून आलेल्या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. त्यानंतर आजूबाजूच्या घरांवर दगड, विटा मारल्या. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाल्याने लोकांची धावपळ उडाली. गावोगावी वाढत झालेली ही गुंडांची दहशत थोपवण्याची मागणी होत आहे.  
------------------------------
वासुली | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
   भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत सागर तुकाराम लांगी (वय २५, रा. शिंदे , ता. खेड ) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना वासुली ( ता. खेड ) येथे घडली आहे. लांगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अरुणकुमार कन्हैयालाल कोल (वय २९, रा. मध्यप्रदेश) या ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
-----------------------------
साबळेवाडी येथे दारूभट्टीवर कारवाई
   पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने चाकणजवळील साबळेवाडी ( ता. खेड ) येथे दारूभट्टीवर कारवाई केली. जयश्री अंकुश जगताप (रा.साबळेवाडी, ता. खेड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीने गावठी हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन जवळ बाळगले, तसेच बेकायदेशीररीत्या दारूभट्टी लावताना आढळून आली. चाकण पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------------------
त्यांनी दिल्या खासदार कोल्हे यांना शुभेच्छा
   लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील यांनी त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
---------------
भामाआसखेड | १५ टक्के पाणी शिल्लक
   खेड तालुक्यातील धरणांना देखील आता पावसाची प्रतीक्षा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर उपसा होत असलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात आता केवळ १५ टक्के पाणी साठ शिल्लक राहिला आहे. या बाबतची माहीती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
------------
खेड | उकाडा वाढला; सायंकाळी तुरळक पाउस
    गेले काही दिवस खेड तालुक्यात दिवसा प्रचंड उकाडा वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दररोज पाउस पडले अशी अपेक्षा असताना पाउस मात्र गुंगारा देत आहे. अखेर शनिवारी ८ जून २०२४ रोजी सायंकाळी आठच्या सुमारास पावसाने तालुक्यातील काही भागात मध्यम ते तुरळक हजेरी लावली आहे.
------------
भीमाशंकर | वाहतूक कोंडीने भाविक त्रस्त
   श्रीक्षेत्र भिमाशंकरला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असुन येथे वाहतुकीच्या कोंडीत भाविकांना अडकुन पडावे लागत आहे.  खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र भिमाशंकरला दर्शनासाठी देशभरातील विविध राज्यासह महाराष्ट्रातुन भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असताना भाविक वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजुने जागा मिळेल तशी आडवी तिडवी लावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पोलिस यत्रंणा नसल्याने भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
----------------
राजगुरुनगर | कचरा जनजागृती ; वासुदेवाची मदत
  राजगुरुनगर नगरपरीषदेने शहरातील नागरीकांसाठी ओला आणि सुका कचरा विलगीकरणासह जनजागृती करण्यासाठी वासुदेवांची मदत घेतली आहे. मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली  सध्या शहरातुन कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडी बरोबरच वासुदेव आपल्या चढ्या आवाजात स्वच्छतेचा संदेश देऊन जनजागृती करत आहे. पहाटेच्या वेळी हरीनामाच्या घोषात वासुदेवाची आरोळी आता चौकासह गल्ली बोळातुन घुमताना दिसत आहे. या अभिनव उपक्रमाचे महिलांमधुन स्वागत केले जात आहे.            
----------------
चाकण | प्रचंड कोंडीचा सामना
  पुणे नाशिक महामार्गावर शनिवारी ८ जून २०२४ रोजी पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
--------------
चांडोली | महावितरणचा १९ वा वर्धापनदिन साजरा
  खेड तालुक्यात चांडोली येथे महावितरणचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाईक रेली, वृक्षारोपण , रक्तदान शिबीर आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावितरणचे राजेंद्र पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सुप्रसिद्ध रीलस्टार व्ही.व्ही. एस. मामा उर्फ विलास सांडभोर यांनी सदर कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेत महावितरणचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्याची मागणी केली.
---------------
=============
=============
भांबोली | मारहाण प्रकरणातील आरोपी पसारच ...
  चाकण एमआयडीसी मधील भांबोली ( ता. खेड ) येथील हॉटेल मध्ये शिरून हॉटेल चालकावर लोखंडी गज आणि दांडक्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींचा अद्याप काहीच थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी या भागातील काही सीसीटीव्ही तपासले असल्याची माहिती समोर आली आहे.  मात्र यातील आरोपींना शोधून तत्काळ अटक करून पुढील काळात असे हल्ले करून आरोपी पसार होणार नाहीत याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे.  
-----------------
जल जीवन मिशन पूर्ण ; टंचाई जैसे थे
   खेड तालुक्यातील पश्चिम भागात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण  होऊन सुध्दा पाण्याची तीव्र टंचाई या भागातील बहुतांश गावात जाणवत आहे.  केंद्र शासनाने राबविलेल्या जल जीवन योजना केवळ ठेकेदार आणि राजकारणी मंडळींचे पोट भरण्यासाठी राबवण्यात आल्याने अयशस्वी ठरल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे.
------------------
चाकण | कांदा बटाट्याच्या दरात वाढ
   खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी ८ जून २०२४ रोजी कांद्याची ७५० क्विंटल आवक होऊन कांद्याला २ हजार ते २८०० रुपये भाव मिळाला. दरम्यान चाकणला बटाट्याची चाकण मार्केट मध्ये बटाट्याची आवक वाढली असून बटाट्याच्या भावात देखील मोठी वाढ झाली आहे. बटाट्याची १३०० क्विंटल आवक होऊन २ हजार ते २७०० रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनकडून सांगण्यात आले.
------------
क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शिल्पांचे भव्य स्वागत
नितीन गोरे | सदस्य, महाराष्ट्र प्र. नि. मंडळ
विनायक घुमटकर | अध्यक्ष, पुतळा समिती ट्रस्ट
तुकाराम कांडगे | सामाजिक कार्यकर्ते
अशोक बिरदवडे | मा. उपसरपंच, चाकण
कालिदास वाडेकर | मा. उपसरपंच, चाकण
राम गोरे | खजिनदार, पुतळा समिती ट्रस्ट
   चाकण मध्ये उभारण्यात येत असलेल्या महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे शनिवारी (दि.८ जून २०२४ रोजी )  चाकण मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी या भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला.
   चाकण शहरातून माणिक चौक ते मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारापर्यंत या शिल्पांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. पारंपारिक वेश परिधान करून आबालवृद्ध यात सहभागी झाले होते.
पुतळा समिती ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी सांगितले कि,  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावर महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्प उभारले जाणार आहेत. तयार झालेली ही भव्य शिल्प शनिवारी चाकण मध्ये आणण्यात आली असून संपूर्ण शहरातून या शिल्पांची मिरवणूक काढण्यात आली. लवकरच या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार आहे. दरम्यान शहरातून ढोल ताशांच्या निनादात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिला भगिनी मोठ्या संखेने सहभागी झाल्या होत्या. शहरात ठिकठीकाणी रांगोळ्या काढून मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण चाकण शहरात आनंदी व उत्साही वातावरण पहावयास मिळाले.    
-----------
आळंदी | त्या दिंड्यांत ९० वारकर्यांना प्रवेश
   यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरातील वारकरी संख्या ठरविण्यासंदर्भात जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी प्रमुख, फडकरी, मानकरी, चोपदार, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आळंदी देवस्थानचे पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात 'श्रीं'चे रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्य ९ उपदिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
-------------
चाकण | तरकारी मार्केट; शनिवार, ८ जून २०२४
कुमार गोरे | मा.अध्यक्ष अडते असो.
   खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी ८ जून २०२४ रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात....
------------
 













--
अविनाश  दुधवडे , चाकण 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)