चाकण | भर शहरात बिबट्याची दहशत; पाच तासांच्या रेस्क्यू नंतर बिबट्या जेरबंद
चाकण :
चाकण शहराच्या मध्यवस्तीत बुधवारी (दि.१५ ) सकाळी सात वाजता बिबट्या आढळून आला आहे. वन विभाग , रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
चाकण शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात आल्यानंतर सैरभैर झालेला बिबट्या पहिल्यांदा चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांच्या घराच्या आवारात आढळला. वन विभागाला आणि पोलिसांना या बाबतची माहिती पत्रकार अविनाश दुधवडे यांच्याकडून देण्यात आली. या भागातील सीसीटीव्ही तपासले असता बिबट्या असल्याची खात्री झाली. दरम्यान बिबट्या चाकण मधील बाजारपेठेच्या भागात एका पडक्या घराच्या आडोशाला जाऊन बसला. वन विभाग आणि रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने लपून बसलेल्या बिबट्याला बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास जेरबंद केले. दरम्यान भुलीचे इंजेक्शन मारल्यानंतर काही वेळ सैरभैर झालेल्या बिबट्याला जागेवरच थांबवण्यात वन विभाग आणि चाकण पोलिसांच्या उपाय योजनांना यश आहे. चाकण मधील बाजारपेठ भाग दुपारपर्यंत ठप्प होता. या भागातील शिवाजी विद्यामंदिर आणि लगतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहे पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. घटनास्थळी वन विभागाचे योगेश महाजन, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व त्यांचे सहकारी ठाण मांडून होते. या संपूर्ण घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. बिबट्याला पकडण्यात आल्यानंतर नागरिकांनी वन विभाग रेस्क्यू टीम, आणि पोलिसांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
सदर बिबट्या साधारणत: ४ ते ५ वर्ष वयाचा शारिरीक दृष्टया सक्षम असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरचा बिबट्या लगतच्या रोहकल किंवा लगतच्या उसाच्या शेती लगतच्या भागातून आला असण्याची शक्यता आहे. शहरातील मध्यवस्तीत बिबट्या नेमका कुठून आला या बाबत अनेक तर्क लावले जात आहेत; मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही. चाकण शहरात बिबट्या आल्याची मागील अनेक वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.
चाकण परिसरात वाढता वावर :
दरम्यान वन विभागाची हद्द ओलांडून मानवी वस्ती कडे धावणाऱ्या बिबट्याची दह्शत उत्तर पुणे जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबटे बहुतांश वेळा मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात ,मनुष्यवस्तीतील शेळ्या, मेंढ्या, कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच सतत बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या , हल्ले करण्याच्या, पाळीव प्राणी मारण्याच्या शेकडो घटना या भागात वारंवार घडतात. वन हद्दीला आणि जंगलाला खेटून शहरे , औद्योगिक वसाहती वसल्या आहेत. सर्रास मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. त्यातून सैरभैर झालेले हे प्राणी खाद्य आणि आसर्यासाठी मनुष्यवस्तीत शिरू लागले. चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्या शिरल्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या होत्या. चाकण लगतच्या ग्रामीण भागात बिबट्यांचे मोठे बस्ताव्य असल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र शहरात पहिल्यांदाच बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पहावयास मिळाली.
-----
PUNE LIVE NEWS | MARATHI
पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
संपर्क | 7020373091/ 9850917070
खेड, चाकण, राजगुरुनगर, आळंदी
KHED, CHAKAN, RAJGURUNAGAR, ALANDI
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा