विजय लॉजिस्टीक कारखान्याला भीषण आग
विजय लॉजिस्टीक कारखान्याला भीषण आग
आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश
११ एकरातील संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी
कोट्यावधी रुपयांचे नुकसान
चाकण जवळील विजय लॉजिस्टीक या कारखान्याला लागलेली भीषण आग ( फोटो : अविनाश लक्ष्मण दुधवडे , चाकण ) |
चाकण :
पुणे-नाशिक महामार्गावरील भाम (ता.खेड.जि पुणे ) हद्दीतील विजय लॉजिस्टीक या टाटा मोटर्सशी संबंधित गोदामाला आज (दि.४ ) रात्री आठ वाजनेचे सुमारास भीषण आग लागून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत ही आग विझविण्यासाठी चार अग्निबंब व अनेक पाण्याच्या टॅँकरच्या सहाय्याने अग्निशामान दलाचे जवान प्रयत्न करीत होते. या दुर्घटनेत कारखान्याच्या सुमारे अकरा एकर जागेतील इमारतीसह मोठी दोन शॉप, कच्चा-पक्का माल , यंत्र सामुग्री , कार्यालय,फर्निचर संपूर्णपणे आगीत स्वाहा झाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीतील नुकसानीचा हा आकडा कोट्यावधी रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
आज (दि.४) रात्री आठ वाजनेचे सुमारास विजय लॉजिस्टीक कंपनीच्या शॉप मध्ये आग लागल्याचे कंपनीतील कामगार ,सुरक्षारक्षक व परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. तत्काळ कंपनीचे अधिकारी व पोलिसांना या बाबतची माहिती देण्यात आली. आगीचा फैलाव कंपनीच्या संपूर्ण ११ एकर परिसरात झाला. आगीचे रौद्र रुप व गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तासाभरात अग्निशामक दलाचे सुरुवातीला दहा वाजे पर्यंत तीन व नंतर एक असे चार अग्निबंब आणि पाच पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ११ एकरातील कारखाना आगीने वेढला गेला. अग्निशामक दलाचे पिंपरी-चिंचवड , बजाज, महिंद्रा ,व एमआयडीसी यांचे चार अग्निबंब व ६० अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र कंपनीत मोठ्या प्रमाणात असलेल्या मालाला आणि सर्व शॉपला लागलेली हि आग आटोक्यात आणण्यात तीन तासांहून अधिक वेळ लोटूनही अपयश आले. आगीचा तांडव पाहता अग्निशमन दलही हतबल झाल्याचे दृश्य पहावयास मिळत होते. सुरुवातीचे तीन तास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यंत्रणेला यश आले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे कारखान्यात सोडले होते. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील आमदार सुरेश गोरे घटनास्थळावर लक्ष ठेवून होते. आगीच्या या तांडवात कुणीही जखमी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत होते. आजूबाजूच्या नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. या कारखान्या कडे येणाऱ्या रस्त्याचा नेमका अंदाज येत नसल्याने मदत कार्यात अडथळा येत होता . रात्री सदेह पर्यंत कारखान्याचे संपूर्ण शॉप , पक्का व कच्चा माल,यंत्रसामुग्री, व कंपनीचे संपूर्ण शेड या दुर्दैवी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले . जेवणाची सूटी असल्याने कुणीही कामगार कामावर नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टाळला असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. रात्री उशिरा पर्यंत मदतकार्य सुरु होते. एक कामगार यात जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितले.
----------------------------
अविनाश दुधवडे , चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा